नवी दिल्ली - सामूहिक बलात्कारामुळे १९ वर्षीय पीडित मुलीचे आयुष्य काळवंडलेच, आणखी एका अबलेला अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यामुळे गर्भार अवस्थेतच पती गमाविण्याची वेळ आली. रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे हरियाणा हादरला. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पंकज फौजी याचा विवाह केवळ १० महिन्यांपूर्वीच झालेला आहे. पंकज याची पत्नी ७ महिन्यांची गर्भवती आहे.बाळाची चाहूल लागलेली असताना ज्या अवस्थेत तरल स्वप्ने पाहायची, त्या दिवसांमध्ये वासनांध पतीमुळे तिला अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागत आहेत. पंकज याच्याशी आपले आता काहीही नाते नाही. त्याने माझा विश्वासघात केला, त्यामुळे त्याच्यासोबत राहणार नाही, असे तिचे म्हणणे आहे.पंकज याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. ज्योती असे त्याच्या अभागी पत्नीचे नाव आहे. ती प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. तिचा अल्पवयीन भाऊ आणि वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे. ज्योतीलाही पंकज याचा ठावठिकाणा माहिती नाही. पोलीस रात्र पाहत नाहीत की दिवस, कधीही घरी येऊन धमक्या देतात. चौकशी सुरू करतात, अशी स्थिती आहे.१५ नोव्हेंबर २०१७ रोजी ज्योतीचा विवाह पंकज याच्याशी झाला. लग्नाला १० महिने सुध्दा झालेले नसताना या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे ज्योतीचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे.नराधमांचा शोध सुरूरेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना तिघांपैकी २ आरोपींना पकडण्याचे आव्हान आहे. या नराधमांना शिक्षा देण्यासाठी पुरावे जमा करण्याचे व ते न्यायालयात सिध्द करण्याचेही दिव्य पार पाडायचे आहे. वैद्यक तपासणीमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला आहे का हे सिध्द करता येते, पण किती जण सामूहिक बलात्कारात होते, हे सिध्द होऊ शकत नाही. त्यामुळे डीएनए चाचणी करुन आरोपींभोवती पाश आवळण्याची तयारी पोलीस करत आहेत. पोलिसांनी १२/१३ सप्टेंबरच्या रात्री जमा केलेले नमुने मधुबन येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. साधारणत: येथून अहवाल मिळण्यास अनेक महिने लागतात. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकांत जाधव यांच्याकडे या प्रयोगशाळेची जबाबदारी आहे. ते प्रयोगशाळेचे संचालक आहेत.
रेवाडी सामूहिक बलात्कार : फरार वासनांध पतीमुळे गर्भवती पत्नीचीही होरपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:20 AM