कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील पीजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉयने तपास यंत्रणेसमोर आधी दिलेल्या जबाबावरून आता पूर्णपणे यू-टर्न घेतला आहे. संजय रॉयने आधीच्या जबाबात मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या, असे म्हटले होते. मात्र आता, हवी ती टेस्ट घ्या, मी काहीही केलेले नाही, मला गोवण्यात आले आहे, असे तो म्हणू लागला आहे.
कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी घेण्यात आलेल्या पॉलीग्राफ टेस्टदरम्यान संजय रॉयने सीबीआयसमोर दावा केला आहे की, जेव्हा तो रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला, तेव्हा पीडिता आधीच मरण पावली होती. लाय डिटेक्टर चाचणीत संजय रॉयची अनेक असत्य आणि अविश्वसनीय उत्तरे समोर आली आहेत. लाय डिटेक्टर चाचणीदरम्यान संजय रॉय घाबरलेला आणि अस्वस्थ होता, असेही अहवालात म्हणण्यात आले आहे.
सीबीआयने अनेक पुराव्यांसह संजय रॉयची चौकशी केली, तेव्हा त्याने अेक बहाणे केले, त्याने दावा केला की, ज्यावेळी त्याने पीडितेला बघितले, तेव्हा ती आधीच मरण पावलेली होती. एवढेच नाही तर, आपण घाबरून परिसरातून पळून गेलो होतो, असा दावाही संजयने केला आहे. तर, कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यानंतर संजय रॉयने बलात्कार आणि हत्येची कबुली दिली होती.
तत्पूर्वी, याप्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले होती की, आपल्याला हत्या आणि बलात्कारासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे आरोपीने कारागृहातील सुरक्षा रक्षकांना सांगितले होते. मात्र, कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संजय रॉयने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली होती.
संजय रायने 23 ऑगस्टला सियालदह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोरही आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसेच आपल्याला यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचेही त्याने म्हटले होते.