मुंबई - रिक्षात बसताना त्याच्या रिक्षाचा क्रमांक वडिलांना व्हॉट्सअॅपवर पाठविण्याचा सल्ला एका सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीला चांगलाच उपयोगी पडला. तिचा विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी गजाआड केले. संशयितावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुलफाम खान (३२) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो वांद्रे परिसरात राहत असून रोजंदारीवर रिक्षा चालवतो. २१ जूनला १६ वर्षीय विद्यार्थिनी रश्मी (नावात बदल) ही सांताक्रुझ येथील कॉलेजमध्ये जाण्यासाठी अंधेरी पूर्व परिसरात सकाळी त्याच्या रिक्षात बसली. वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, तिने रिक्षाच्या नंबर प्लेटचा फोटो काढत तो वडिलांना व्हॉट्सअॅपवरून पाठवून दिला. कॉलेजच्या गेटवर रिक्षा थांबवत ती त्याला पैसे देत असताना खान याने तिला अश्लीलपणे स्पर्श केला आणि तिथून पसार झाला. हा प्रकार रश्मीने घरच्यांना सांगितला़ त्यांनी या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० चे पोलीस निरीक्षक अरविंद घाग यांचे पथकदेखील या प्रकरणी चौकशी करीत होते. रश्मीने वडिलांना पाठविलेला रिक्षाचा क्रमांक घेऊन ते शिताफीने रिक्षा मालकापर्यंत पोहोचले. त्यामुळे आरोपीची ओळख पटली. मात्र खान तोपर्यंत मुंबई सोडण्यात यशस्वी झाला आणि त्याने उत्तर प्रदेश गाठले. गुजरात रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून अखेर वापी परिसरातून खानला अटक केली़
रिक्षाक्रमांक व्हॉट्सअॅप केल्याने सापडला आरोपी, रिक्षाचालकाला गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 2:23 AM