कल्याण - जावेद शेख या रिक्षाचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल रोकड आणि रिक्षा घेऊन पोबारा करणा-या पाच पैकी चौघा आरोपींना अवघ्या सहा तासात अटक करण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन असून अन्य एकजण फरार आहे.अंबरनाथमध्ये राहणारा शेख बुधवारी रात्री 10 वाजता तेथील साईबाबा मंदिर जुना बस स्टॅण्डजवळ असताना एक महिला आणि पुरूष प्रवाशी त्यांच्या रिक्षात बसले आणि त्यांनी रिक्षा कल्याण पूर्वेकडील रेल्वे कवॉटर येथे घेण्यास सांगितले. रिक्षा त्याठिकाणी आली असता तेथे आणखीन दोन प्रवासी आधी बसलेल्या प्रवाशांनी रिक्षात घेतले आणि रिक्षा पुर्वेतील काटेमानिवली येथे घेण्यास शेखला सांगितले.
शेख रिक्षा काटेमानिवली पूलाकडे घेऊन जात असताना रिक्षात बसलेल्या चौघांपैकी एकाने त्याला चाकू दाखवून दमदाटी केली आणि ड वॉर्ड जवळील रस्त्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितली. रिक्षा थांबविताच त्याठिकाणी आणखीन एक व्यक्ती आली आणि सर्वानी शेख याला मारहाण करण्यास सुरूवात केली. लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली गेली. यात शेख गंभीर जखमी झाले. याचा फायदा उठवित संबंधितांनी त्यांच्या खिशातील मोबाईल, 500 रूपये रोकड असलेली पर्स चोरली त्याचबरोबर शेख यांची रिक्षा देखील पळवून नेली. याप्रकरणी शेख यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत पाच जणांविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान सहा तासांच्या आत सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे पाटील यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या आधारे पाच पैकी चार आरोपींना अटक केली. आरोपी उल्हासनगरमधील राहणारे आहेत. मुख्य आरोपी करण दखनी हा उल्हासनगरमधील सराईत गुन्हेगार आहे. त्याची पत्नी चैताली पाटील आणि मित्र कुणाल जाधव याचाही अटक आरोपींमध्ये समावेश आहे. अन्य एक अटक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहीती बोचरे पाटील यांनी दिली.