धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदर पूर्वेच्या इंदिरा नगर झोपडपट्टीत दारांच्या कड्या तोडून मोबाईल चोरणारा चोर हा त्याच झोपडपट्टीत राहणारा व रिक्षा चालवणारा असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून ९ मोबाईल व रोख जप्त केले आहेत.
शनिवारच्या पहाटे नवघर येथील इंदिरा नगर झोपडपट्टीत अमेश दत्ताराम जाधव, अल्ताफ शेख , कैलासनाथ श्यामसुंदर यादव व मुस्कीम नूरअली खान ह्या चौघांच्या घरांच्या कड्या तोडून ९ मोबाईल चोरण्यात आले होते . तर त्याच दिवशी पहाटे ३ च्या सुमारास राहुल ओमप्रकाश हरिजन (२४) ह्याच्या घराची कडी तोडून चोरट्याने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला होता . मात्र राहुल यांना जाग आल्याने त्यांनी प्रतिकार करत पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरटा ५ हजारांची रोख लुटून पळून गेला होता .
एकाच पहाटे जबरी लूट व चोरीच्या ५ घटना घडल्याने खळबळ उडाली . परिमंडळ १ चे उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त डॉ. शशीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार, गुन्हे निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक प्रमोद पाटील व अभिजित लांडे सह भूषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत यांच्या पथकाने गुन्ह्यांचा तपास सुरु केला.
पोलिसांनी खबऱ्यां कडून माहिती मिळ्वण्यासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज , तांत्रिक विश्लेषण आदी विविध मार्गानी आरोपीचा शोध चालवला होता . त्यातूनच रिक्षा चालवणारा व इंदिरा नगर भागातच राहणारा सराईत चोरटा विवेक विश्वनाथ तोरडे (२६) याला पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्या कडून शनिवारच्या ५ गुन्ह्यातील चोरलेले ९ मोबाईल व ५ हजार रोख असा ७५ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याआधी तोरडे याला अल्पवयीन असताना चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते . तर मध्यंतरी त्याला लोकांनी चोरीच्या संशय वरून पकडले मात्र त्याच्या कडे चोरीची वस्तू सापडली नसल्याने सोडून दिले होते. तोरडे हा इंदिरा नगर भागातच रहात असल्याने त्याला परिसराची माहिती होती असे पोलिसांनी सांगितले.