लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कासारवडवली, आनंदनगर आणि वागळे इस्टेट, इंदिरानगर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत कोकेन व एलएसडी असे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या पॉल चुकवू (वय ४८) आणि गोक लॉरेन्स अजाह (३२) या दोघा नायजेरियन व्यक्तींसह रिक्षा चालक लक्ष्मण अनिरुद्ध साव (२७) याला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या युनिट ५ जेरबंद केले. त्यांच्याकडून एकूण ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १४७ ग्रॅम वजनाचा कोकेनचा समावेश आहे.
वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने १२ लाख ८० हजार रुपयांचे ३२ ग्रॅम कोकेन व १ लाख २० हजार रूपये किमतीचे ०.२२ ग्रॅम वजनाचे एलएसडी १५ नग डॉट हा अमली पदार्थ व १ हजार ९४० रुपयांची रोकड व मोबाइल, असा १४ लाख ०१ हजार ९४० रूपयांचा साठा हस्तगत केला.
रिक्षाही हस्तगत
४६ लाखांचा ११५ ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ, १ लाखाची रिक्षा व रोख एक हजार, असा एकूण ४७ लाख ०१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही प्रकरणांचा गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू आहे. ही कारवाई वागळे युनिट-५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, पोलिस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील अहिरे या पथकाने केली.