मीरा रोड येथे राहणाऱ्या एका रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेल्या एका प्रवाशाची १४ लाख रुपये किमंतीची सोन्या-चांदीचे दागिने असणारी बॅग परत केली आहे. या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक कऱण्यात येत आहे. इफ्तिखार अली नादीर खान असं या रिक्षाचालकाचे नाव आहे. इफ्तिखार खान यांनी १४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची बॅग पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत केली आहे.
मीरा-भाईंदर शहरात रिक्षा चालवणारे रिक्षाचालक इफ्तिखार अली नादीर खान यांनी शनिवारी महिला प्रवाशाला काशिमिरा परिसरात सोडले. त्यानंतर रिक्षाचालक दुसऱ्या दिवशी सीएनजी भरण्यासाठी पंपावर गेला असता मागे असणाऱ्या जागेत त्याला शनिवारी एक महिला बॅग विसरल्याचे दिसले. या बॅगेमध्ये कोणत्या वस्तू आहेत त्याची पाहणी न करता त्याने मीरा रोड पोलीस ठाणे गाठले आणि त्या बॅगेची माहिती दिली. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम तीन मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे १४ लाख रुपयांचे साहित्य असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सापडलेल्या मोबाईल फोनद्वारे संबंधित व्यक्तीला संपर्क साधला. त्यावेळेस ती महिलादेखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आली होती. यानंतर त्या महिलेने आपली बॅगेची ओळख पटवून दिल्यानंतर बॅग तिच्या ताब्यात देण्यात आली. रिक्षाचालकाने रिक्षा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केली आहे. लॉकडाउनमुळे गेल्या सात महिन्यांपासून हप्ते थकले होते. मात्र, तरीदेखील प्रामाणिकपणे रिक्षात विसरलेली बॅग पोलीस ठाण्यात जमा केल्याने कौतुक केले जात आहे.