सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिसांनी बुधवारी सकाळी साडे पाच वाजता दोन तलवारीसह एक रिक्षा जप्त करून एकाला अटक केली. त्याचे तीन साथीदार पळून जाण्याचा यशस्वी झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगरात गुन्हेगारी संख्येत वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने, गेल्या आठवड्यात गुन्ह्याच्या संख्येत घट झाली. तसेच चाकू, तलवार, चॉपर असे घातक शस्त्र बाळगणाऱ्याना पोलिसांनी गस्ती दरम्यान अटक केल्याचे गुन्हे दाखल झाले. बुधवारी सकाळी साडे पाच वाजता मध्यवर्ती पोलीस कॅम्प नं-२ भय्यासाहेब आंबेडकरनगर चौक परिसरातून गस्त घालत असताना एका रिक्षात काही तरुण संशयितरित्या बसल्याचे दिसले. त्यांना पोलिसांनी हटकले असता, तिघे जण पळून गेले. तर मल्हार गोडबोले या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हां पोलिसांच्या झाडाझडतीत दोन तलवारी मिळून आल्या. पोलिसांनी दोन तलवारीसह रिक्षा जप्त केला असून मल्हार गोडबोले या तरुणाला अटक केली. त्याच्या पळून गेलेल्या साथीदारांच्या पोलीस शोध घेत असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.