नालासोपारा : रिक्षा युनियनचा नालासोपारा शहर अध्यक्ष, त्याचा मुलगा व भाऊ यांच्यावर बोईसरमध्ये सिगारेटवरून झालेल्या वादातून ७ ते ८ आरोपींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या हल्ल्यात रिक्षा युनियनच्या अध्यक्षाचा मृत्यू झाला असून मुलगा व भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
नालासोपाऱ्याच्या तुळिंज रोडवरील राधानगरमधील हरिप्रसाद बिल्डिंगमध्ये विनोदकुमार सिंग परिवारासह राहत होते. ते रिक्षाचालक-मालक संघटनेचे नालासोपारा शहर अध्यक्ष होते. त्यांचे बोईसर येथील वारांगडे गावात दुध डेअरी आणि किराणा सामानाचे दुकान आहे. रविवारी रात्री त्यांचा मुलगा सत्येंद्रप्रसाद (२०), ते आणि त्यांचा भाऊ आनंदकुमार हे दुकान बंद करून जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते.
रात्री पावणेबाराच्या सुमारास गावातील ७ ते ८ आरोपी दुकानासमोर येऊन सिगारेटची मागणी केली. विनोदकुमार यांनी दुकान बंद झाले असून सिगारेट मिळणार नाही, असे सांगितल्यावर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेले. काही वेळाने आरोपी हातात लाठीकाठी, सळई, दगड घेऊन येत सिगारेट न दिल्याच्या रागातून तिघांवर जीवघेणा हल्ला केला. एका आरोपीने दुकानाची तोडफोड करताना तुटलेल्या काचेचा तुकडा हातात घेऊन गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली.
पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी
घटनेनंतर गंभीर जखमी विनोद यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, पण तब्येतीमध्ये सुधारणा होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर बोईसर येथून नालासोपाऱ्याच्या स्टार हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास आणण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सोमवारी सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा व भावालाही नालासोपाऱ्यात उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सिगारेटवरून झालेल्या वादातून ७-८ आरोपींनी तिघांना मारहाण केली होती. पाच आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. एकाचा मृत्यू झाल्याने हत्येची कलमे वाढविण्यात येणार असून गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत. - कलगुंडा हेगाजे, पोलीस उपअधीक्षक, बोईसर विभाग, पालघर