मुंबई : दृश्यम चित्रपटातील अभिनेता अजय देवगणच्या डायलॉगप्रमाणे ‘मी हत्या केलीच नाही. २७ डिसेंबरला आई पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे मी तुकडे केले’, असे रिम्पल जैन हिने न्यायालयात सोमवारी सांगितले. २७ डिसेंबरला वीणा जैन यांच्याबाबतीत नेमके घडले काय, याचे गूढ कायम असून या प्रकरणात अन्य कुणाचा हात आहे किंवा कसे, याच्या तपासासाठी रिम्पलच्या पोलिस कोठडीत २४ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली.
आई वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या रिम्पलची पोलिस कोठडी सोमवारी संपुष्टात आली. तिची कोठडीत वाढ करावी यासाठी रिम्पलला शिवडी कोर्टात न्यायाधीश एस. एस. घारे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील वैशाली आगवणे यांनी तिच्या वाढीव कोठडीसाठी मागणी केली. आतापर्यंत गुन्ह्यांत वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ज्या दुकानातून हत्यारांची खरेदी झाली तेथेही तपास करण्यात आल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले.
या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, आणखी कुठल्या हत्यारांचा वापर झाला का, यासाठी रिम्पलच्या बोटांचे ठसे घेणे बाकी असल्याचे सांगत कोठडी वाढविण्याची मागणी कोर्टाला केली गेली. न्यायालयाने रिम्पलच्या कोठडीत २४ तारखेपर्यंत वाढ केली आहे. तपास अधिकारी सुदर्शन चव्हाण अधिक तपास करत आहेत.
रिम्पलचा आत्मविश्वास यावेळी कोर्टाने रिम्पलला आईची हत्या का केली, असे विचारले असता तिने आपण हत्या केलीच नाही, असे कोर्टाला सांगितले. २७ तारखेला आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली. दोन मुलांनी तिला उचलून घरी आणले. त्याच, दिवशी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर येईल, माझे घर जाईल, आईचे मामाकडे असलेले बँकेतील पैसे मिळणार नाही, या भीतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे रिम्पलने सांगितले. आत्मविश्वासाने ती सर्व प्रश्नांची उत्तरे देत होती.
सँडविच विक्रेत्याकडे सर्व माहिती हॉटेलच्या दोन मुलांनी वीणा जैन यांना उचलून घरी आणले तेव्हा त्या जिवंत होत्या, असे चौकशीत समोर आले. त्यानंतर काही वेळाने रिम्पलने सँडविच विक्री करणाऱ्या अमजद अली ऊर्फ बॉबी या मित्राला बोलावून घेतले. त्याने आईची नस पाहून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.