नवी दिल्ली-
अंडरवर्ल्ड डॉन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम यानं भारत विरोधी कारवायांसाठी एका स्पेशल युनिटची स्थापना केली आहे. एनआयएनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) भारताचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी आणि अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलेला दाऊद इब्राहिम तसंच त्याच्या टोळीविरोधात एफआयआर दाखल केली होती. याच एफआयआरच्या आधारावर ईडीनं मनी लॉड्रींगचाही गुन्हा दाखल केला आहे.
एनआयएनं FIR मध्ये केलल्या खुलाशानुसार दाऊद इब्राहिम यानं भारताविरोधात कारवाईसाठी एक स्पेशल यूनिटची स्थापना केली आहे. पाकिस्तानात आश्रयास असलेला दाऊद इब्राहिम यानं त्याच्या स्पेशल यूनिटच्या माध्यमातून भारताला लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. यात भारतातील बडे लोक, राजकीय व्यक्ती, सुप्रसिद्ध उद्योगपतींसह अनेक लोकप्रिय व्यक्तींचा समावेश आहे. एफआयआरमधील माहितीनुसार दाऊद इब्राहिमची स्पेशल युनिट शस्त्र आणि विस्फोटकांच्या सहाय्यानं हल्ल्याची योजना आखत आहे.
भारतात विविध राज्यांमध्ये दंगल घडेल अशा घटना घडवून आणण्यासाठी दाऊद प्रयत्नात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे स्पेशल यूनिटच्या निशाण्यावर दिल्ली आणि मुंबईसह अनेक मोठी शहरं आहेत.
काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं केंद्रीय संस्थांच्यासोबत मिळून दोन पोकिस्तानी दहशतवाद्यांसोबत काही जणांना उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. याच लोकांनी आयएसआय आणि अंडरवर्ल्डच्या नव्या टेरर मॉड्यूलचा खुलासा केला होता. याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेलनं खुलासा करत अटक करण्यात आलेले आरोपींना दाऊद आणि त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी हवालाच्या मार्फत पैसा पुरवला असल्याची माहिती जाहीर केली होती. यासोबत बॉम्बस्फोटांसाठी आयईडी देखील दाऊदनं उपलब्ध करुन दिला होता.