जळगाव : चिकनच्या दुकानाजवळ आग लावल्याच्या संशयावरुन फातेमा नगरात दोन गटात वाद उफाळून नंतर एमआयडीसीतील कंपनीवर दगडफेक व तोडफोड झाल्याची घटना मध्यरात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी सतीष सुनील पाटील (२७,रा.कुसुंबा) याने दिलेल्या फिर्यादीवरुन माजी उपमहापौर करीम सालार यांचा मुलगा रेहान अब्दुल करीम सालार, साजीद अब्दुल सालार, आमीर अब्दुल रज्जाक सालार यांच्यासह इतर अनोळखी ५ ते सात जणांविरुध्द तर रेहान सालार याच्या फिर्यादीवरुन अनोळखी ५ ते ६ जणांविरुध्द रविवारी दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीष पाटील हा तरुण नरेंद्र मानसिंग पाटील यांच्या मालकीच्या एमआयडीसीतील एस.५३ सेक्टरमधील शुभसखी या पीव्हीसी पाईप कंपनीत कामाला आहे. शनिवारी त्याची रात्रपाळीची ड्युटी होती.रात्री १० वाजता सतीष, पवन गणेश पाटील व अविनाश सुभाष दांडगे असे तिघं जण दुचाकीने जेवणाचा डबा घ्यायला कुसुंबा येथे गेले होते. तेथून परत येत असताना फातेमा नगराच्या कॉर्नरजवळ चिकनच्या दुकानाजवळ आग लागल्याचे दिसल्याने तिघं जण तेथे थांबले असता तेथे पांढऱ्या कारमधून तसेच दुचाकीवरुन काही जण आले. त्यावेळी तिघं जण कंपनीत निघून गेले. त्यानंतर कार व दुचाकीस्वार त्यांच्या मागे आले.
आग याच मुलांनी लावल्याचा संशय व्यक्त करुन या लोकांनी अचानक रात्री ११.१५ वाजता दगडफेक केली. त्यानंतर कंपनीचे शटर उघडून आतमध्ये प्रवेश करुन तोडफोड करुन पवन पाटील, अविनाश दांडगे, मंगेश सुभाष पाटील, प्रवीण प्रल्हाद कुंभार, नितीन विठ्ठल पाटील व सतीश पाटील या कामगारांना रॉड व बॅटने मारहाण करायला सुरुवात केली. मालक नरेंद्र पाटील व पवन याच्या दुचाकीची तोडफोड केली. घटनास्थळी दाखल झालेले कंपनीचे मालक नरेंद्र पाटील यांनाही या जमावाने रॉडने बेदम मारहाण केली. यात चौघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
सालार गटाचीही तक्रार
रेहान सालार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चुलत भाऊ साजीद सालारसोबत कारने (क्र.एम.एच.१९ सी.व्ही.६५५५) फातेमा नगरात काकूकडे गेले असता एमआयडीसीतील एस.सेक्टरजवळील मराठे पाईपसमोर ५ ते ६ जणांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन कारवर दगडफेक केली. तेव्हा पाठीमागे भाऊ आमीर अब्दुल रज्जाक सालार हा एम.एच.१९ सी.यु.३५२९ ही गाडी घेऊन जात असताना त्यांच्यावरही या लोकांनी दगडफेक केली. लोकांची गर्दी झाल्याचे पाहून हे लोक शुभसखी कंपनीकडे पळून गेल्याचे म्हटले आहे.