दोंडाईचा (जि.धुळे) : अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून दोंडाईचा येथे बुधवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन जखमी झाले आहेत. तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. (Riots over girl molestation in Dhule district; Death of one )बुधवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीत शाहबाज शाह गुलाब शाह (४५) यांचा मृत्यू झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड दोन मुलांनी काढली. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या भावाला सांगितला. त्याने छेड कढणाऱ्या दोघा मुलांना चोप दिला. दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा पॉक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी संशयित आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येेने पोलीस ठाण्यात आले. जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचाऱ्यांवर दडपण आणून आणण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद विकोपाला गेला. जमावाने दोन संशयितांना पोलिसांच्या ताब्यातून सोडवित पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. जमावाच्या हल्ल्यात वारे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करत असताना पुन्हा वाद निर्माण होऊन दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती कळताच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी दाखल झाले. दोंडाईचात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात मुलीच्या छेडछाडीतून दंगल; एकाचा मृत्यू, दोंडाईचा येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 7:20 AM