लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तक्रारदाराचे वैद्यकीय देयक व थकीत पगार काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना जिल्ह्यातील रिसोड येथील कोषागार अधिकारी सचिन विक्रम कंकाळ (३५) व शासकीय मुलींच्या वसतिगृहातील लिपीक राहुल नामदेव जाधव (३०) या दोघांना लाचलुचपत विभागाने बुधवार, २६ सप्टेंबर रोजी जेरबंद केले.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय देयक आणि थकीत पगार काढण्यासाठी कोषागार अधिकाºयांनी वसतिगृह लिपीकाच्या माध्यमातून तक्रारदारास तीन हजार रुपये मागितले. तडजोडीअंती त्यातील दोन हजार रुपये २६ सप्टेंबर रोजी देण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता, मुलींच्या वसतिगृहाचा लिपीक राहुल जाधव याने तक्रारदाराकडून घेतलेले दोन हजार रुपये कोषागार अधिकारी स्विकारत असताना दोघांनाही रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई अमरावती लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक धिवरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक गांगुर्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, नंदकिशोर परलकर, विनोद अवगळे, नावेद शेख आदिंनी केली.
दोन हजारांची लाच घेताना रिसोडचा कोषागार अधिकारी जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:58 PM