औरंगाबाद : व्हॉट्सअॅपची पडताळणी करायची असल्याचे सांगून व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला सहा अंकी मेसेज (व्हेरिफिकेशन कोड) पाठवून तो कोड विचारून घेत व्हॉट्सअॅपवर ताबा (अॅक्सेस ) घेण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगार वापरत आहेत. व्हॉट्सअॅपचा अधिकृत मेसेज असल्याचे समजून शहरातील अनेकांनी त्यांना आलेला सहा अंकी नंबर हॅकर्सला पाठविल्याने त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाले.
व्हॉट्सअॅपकडून अशी कोणतीही पडताळणी केली जात नसल्याने, अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हजारो व्हॉट्सअॅप यूजर्सना We have sent you a request for identity verification. The digit verification is used to activated a whatsapp account on a new deviceअसा मेसेज प्राप्त होत आहे.
हा मेसेज खरा वाटावा याकरिता हॅकर्स मेसेजमध्ये व्हॉट्सअॅपचे आयकॉन दर्शवितात. व्हॉट्सअॅप कंपनीने मेसेज पाठवल्याचे समजून मोबाईलवर आलेला सहा अंकी कोड मेसेज अनेक जण परत (हॅकर्सला ) पाठवतात. हा कोड प्राप्त होताच हॅकरला तुमच्या व्हॉट्सअॅप खात्याचा अॅक्सेस प्राप्त होतो . सायबर तज्ज्ञ निरंजन चाबुकस्वार यांनी सहा अंकी कोड हॅकर्सला देणे वापरकर्त्यासाठी धोक्याचे असल्याचे नमूद केले. हॅकर्स अॅक्सेस मिळवून त्या व्हॉट्सअॅपमधील डाटा, वैयक्तिक माहिती, छायाचित्र, व्हिडिओ आणि मित्रांची माहिती चोरतात. हॅकर तुमच्या मित्रांना असे व्हेरिफिकेशन कोडचे मेसेज पाठवितात आणि त्यांचेही व्हॉट्सअॅप हॅक करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही व्हेरिफिकेशन कोड शेअर केला असेल तर तात्काळ व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल नंबरची पुन्हा पडताळणी करा आणि नवीन कोड मिळवून पोलिसांशी संपर्क साधावा.हॅकर्स कशी करतात फसवणूकव्हॉट्सअॅप हॅक केल्यानंतर त्याच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांच्या नंबरवर हॅकर्स तुमच्या अकाउंटवरून सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवतात. चुकून मेसेज तुला पाठवला आहे तो मेसेज परत पाठव, असे सांगतात. मित्राच्या व्हॉट्सअॅपवरील मेसेज असल्याचे समजून तो सहा अंकी क्रमांक परत पाठविताच तो मित्रही हॅकर्सची शिकार होतो. त्याचाही व्हॉट्सअॅप हॅक होतो. असे सायबर तज्ज्ञ शैलेश दहिवाल यांनी सांगितले.