लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याचाच तिने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्याने, सुशांतने आॅर्गेनिक शेतीचा व्यवसाय करण्याचे ठरवताच, रियाने त्याला विरोध केला. त्याचे मेडिकल रिपोर्ट माध्यमांना देऊन, त्याला वेडे ठरविणार असल्याची धमकी देत घरातील कागदपत्रे घेऊन ती निघून गेली. याच तणावातून त्याने आयुष्य संपविल्याचा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.
पुढे तक्रारीत दिलेल्या माहितीत, सुशांत कुर्गला जाऊन शेती करण्याच्या तयारीत होता. याबाबत मित्र महेशसोबत त्याची चर्चाही झाली. मात्र रियाने त्याला विरोध केला. पुढे, ८ जून रोजी घरातील दागिने, पैसे, लॅपटॉप, क्रेडिट, डेबिट कार्ड घेऊन ती निघून गेली. जाताना त्याच्या मानसिक स्थितीसंदर्भात सुरू असलेल्या उपचारांची कागदपत्रेही नेली. माझे ऐकले नाहीस तर हे रिपोर्ट माध्यमांना देत, वेडे ठरविण्याची धमकी दिली. त्यामुळे भविष्यात कुठेच काम मिळणार नाही, असे सांगून तिने घर सोडले. या प्रकारानंतर सुशांतने घडलेला प्रकार बहिणीला फोन करून सांगितला आणि रिया मला अडकवेल याबाबतची भीती व्यक्त केली. त्यानुसार बहिणीने त्याच्याकडे धाव घेतली. तीन ते चार दिवस बहीण सुशांतकडे राहिली. तिने त्याची समजूत काढली. मात्र मुलगी लहान असल्याने तिला त्याच्याकडे जास्त दिवस थांबता आले नाही. १२ जून रोजी ती तिच्या घरी निघून गेली. त्याच्या दोन दिवसानंतरच सुशांतने आत्महत्या केली. तसेच सुशांतची मॅनेजर दिशा सलियनच्या आत्महत्येमुळेही सुशांत घाबरला होता. त्याने रियाला अनेक कॉल केले. मात्र तिने सुशांतचा मोबाईल ब्लॉक केला होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
रियाची भेट होण्यापूर्वी सुशांतचे काम चांगले सुरू होते. मात्र २०१९ मध्ये रिया आयुष्यात येताच त्याचे काम थांबले. यामागेही बॉलीवूड मधील काही दिग्जज मंडळीचा हात असल्याने त्यादिशेनेही चौकशी होण्याची मागणी त्यांनी केली आहे.
१७ कोटींपैकी १५ कोटींचे व्यवहार संशयास्पदसुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी त्याच्या खात्यात १७ कोटी होते. त्यापैकी १५ कोटी त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वळते झाले. यात सुशांतचे क्रेडिट, डेबिट कार्ड रियाकडेच होते. त्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबाने पैसे खर्च केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.