मथुरा (उत्तरप्रदेश) : पंचायत निवडणुकीदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी फरार असलेला रालोद नेता योगेश नौहवार याला त्याच्या घरातून गजाआड करण्यात आले. याच प्रकरणात त्याचा साथीदार अजय सिंह यालाही अटक करण्यात आली आहे.नौहवारने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु न्यायालयाने पोलिसांच्या आक्षेपानंतर तो फेटाळला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्हा पंचायत सदस्यपदाचे उमेदवार व रालोद समर्थित उमेदवार सोनू चौधरी याने लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी २० एप्रिल रोजी पंचायत बोलावली होती. यावेळी मेजवानीचाही बेत होता; मात्र याला प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस मुडिलया गावात गेले. तेथे विनापरवानगी अनेक लोक जमलेले पाहिले. लोक कोरोना नियमांचेही पालन करीत नव्हते. निवडणूक अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मेजवानी सुरू होती. पोलिसांनी लोकांना तेथून जाण्यास सांगितले असता, दगडफेक करण्यात आली. यात पोलीस ठाणे प्रभारीसह चार पोलीस गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आली होती.या घटनेनंतर पोलिसांनी १२ पेक्षा अधिक आरोपींना अटक केली होती; परंतु मुख्य आरोपी नौहवार व उमेदवार सोनूसह अन्य आरोपी फरार झाले होते. नौहवारचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला गजाआड करण्यात आले.
पोलिसांवरील हल्लाप्रकरणी रालोद नेता अटकेत, निवडणूक काळात केली होती दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 8:50 AM