लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगारी व आर्थिक तंगीचा सामना करीत असलेल्या एका पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांने भरदिवसा बँकेत शिरून कॅशियरच्या गळ्याला चाकू लावून लुटले. ही घटना शुक्रवारी पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एसबीआय बँकेत घडली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला घटनास्थळावरच पकडले.आरोपी बाळाभाऊपेठ येथील रहिवासी करण प्रकाश मदनकर आहे. करण पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात भाऊ व बहीण आहे. त्याचे कुटुंब काका-काकूसोबत राहते. तो शिक्षणाबरोबरच फोटोग्राफीचे व व्हिडिओ शुटींगचे काम सुद्धा करतो. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले आहे. करण याने एकाकडून १० हजार रुपये उधार घेतले होते. ते परत करणे शक्य नव्हते. रोजगाराचे दुसरे साधन नव्हते. त्यामुळे करणने बँक लुटण्याची योजना आखली. तो चाकू घेऊन घरून दुपारी १२.३० वाजता वैशालीनगरच्या एसबीआय शाखेत पोहचला. बँकेत कॅशियर सारिका दीनानाथ जांभुळकर यांच्यासह सफाई कर्मचारी व ग्राहकासोबतच चार ते पाच लोक होते. करण याने चाकू काढून सफाई क र्मचाऱ्याच्या गळ्याला लावला. त्याला मारून टाकण्याची धमकी कॅशियरला दिली. त्यांना जवळचे पैसे देण्याची मागणी केली. कॅशियरने घाबरून काऊंटरवरील १ लाख १३ हजार ९६० रुपये त्याला दिले. पैसे घेऊन पळत असताना, सफाई कर्मचारी व कॅशियर चोर चोर म्हणून आवाज देऊ लागले. बँकेच्या खाली दोन ते तीन ग्राहक उभे होते. त्यांनी करणचा पाठलाग केला. त्याचवेळी रस्त्यावरून पाचपावली ठाण्याचे बीट मार्शल मनोहर पाटणसावंगेकर व ओमप्रकाश त्रिवेदी जात होते. आवाज ऐकून ते सतर्क झाले. त्यांनी पाठलाग करून करणला पकडले. त्याने आर्थिक तंगीमुळे बँकेत लूट केल्याचे सांगितले.त्याच्याकडून १ लाख १३ हजार ९६० रुपयातून ९० हजार रुपये मिळाले. उर्वरीत पैसे कुठे गेले याचा तपास पोलीस करीत आहे. २२ मार्चपासून लोक घरात कैद आहे. पोलिसांच्या भीतीने गुन्हेगारही बाहेर निघत नाही. त्यामुळे गुन्ह्यांवर अंकुश लागला आहे. गेल्या सहा दिवसात लुटीची ही पहिली घटना आहे. ही घटना ‘लॉकडाऊनचा’ दृश्य परिणाम आहे.
भरदिवसा बँकेत शिरून कॅशियरला लुटले : आरोपी विद्यार्थी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:06 PM
लॉकडाऊनमुळे बेरोजगारी व आर्थिक तंगीचा सामना करीत असलेल्या एका पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांने भरदिवसा बँकेत शिरून कॅशियरच्या गळ्याला चाकू लावून लुटले.
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीतून केला गुन्हा