लातूर : नांदेड राज्य महामार्गावरील कोळपा गावानजिक शुक्रवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करीत, चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कमेसह चारचाकी वाहन पळविल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील संग्राम दादाराव गिते (४३, रा. माळाकोळी ता. लोहा) हे आपल्या चारचाकी वाहनाने (एमएच २६ एके ०३४०) शुक्रवारी रात्री गावाकडे निघाले होते. दरम्यान, वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तिघांनी त्यांचे वाहन कोळपा गावानजिक सिनेस्टाईल पद्धतीने अडविले. यावेळी अज्ञात तिघांनी संग्राम गिते यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील दोन अंगठ्या, रोख ५० हजार रूपये आणि मोबाईल असा ऐवज काढून घेतला. त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनातून खाली ढकलण्यात आले. यावेळी संग्राम गिते यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांनी रोख रक्कमेसह इतर मुद्देमाल व वाहन पळवून नेले. भेदरलेल्या अवस्थेत वाहन मालक गिते यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहित दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि विवेकानंद चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही अंतरावर त्यांचा हिसकावलेला मोबाईल चोरट्यांनी रस्त्यालगत टाकून दिल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातुरातून लुटारूंनी केला पाठलागकाही कामानिमित्त वाहन मालक संग्राम दादाराव गिते हे लातुरात आले होते. दरम्यान, रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ते माळाकोळी या गावाकडे निघाले होते. शहराबाहेर पडल्यानंतर त्यांनी कोळपा गावानजिकच्या कृषी महाविद्यालयाजवळ लघु शंकेसाठी वाहनाचा वेग कमी केला. यावेळी अज्ञात तिघा चोरट्यांनी वाहन आडवे लावून त्यांना अडविले. यावेळी चाकूचा धाक दाखवित त्यांना लुटण्यात आले. लातूर-नांदेड हा राज्यमहामार्गावर दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते़ काही क्षणात सिनेस्टाईल पद्धतीने लुटून हे तिघे चाकूरच्या दिशेने पसार झाले, अशी माहिती स्थागुशाचे पोनि़ सुनिल नागरगोजे यांनी दिली़