मीरारोड - मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून त्यात काचेचा तुकडा टाकत लोकांचे मोबाईल लंपास करणे वा बळजबरी हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चौकडीला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. मेरठ व दिल्लीचे हे आरोपी असून आतापर्यंत १२ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत मुन्शी कंपाउंड येथील पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावर मोहम्मद नूर मोहम्मद खान हा काम करत असताना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल दुकान कुठे अशी विचारणा केली. नूर ह्याला बोलण्यात गुंगवत ता इसमाने मोबाईल कव्हर देतो सांगून त्याचा मोबाईल हातचलाखीने लंपास करत कव्हर मध्ये काचेचा तुकडा टाकून दिला.
तो इसम व त्याचा साथीदार दुचाकी वरून आलेला साथीदार मोबाईल घेऊन पळून जात असताना नूर ह्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते धक्का मारून पळून गेले. त्याचा गुन्हा १० डिसेंबर रोजी काशीमीरा पोलिसांनी दाखल केला होता. अश्या प्राकाराच्या घटना शहरात वाढल्या असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, गुन्हे प्रकटीकरणचे निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश कावरे सह सचिन हुले, हणमंत तेरवे, परेश पाटील, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रवींद्र कांबळे व जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज सह तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला.
पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे कुर्ला भागातून सापडले. सोनु मलिक, दानिश जाहीद मलिक, मोहमद साजीद अब्दुल कादीर राजपूत हे तिघे आरोपी उत्तर प्रदेशच्या मेरठ भागातील तर सागर विनोद वर्मा हा नवीदिल्लीच्या शहादरा भागात राहणारा आहे. ह्या आरोपींची एकट्या काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ५ गुन्हे केले आहेत. नवघर पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्हे तर मीरारोडचे नयानगर, भाईंदर, पेल्हार, खडकपाडा व मुंबईच्या गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण १२ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
लोकांना त्यांचा मोबाईल खरेदी करायचा सांगून, मोबाईल कव्हर गिफ्ट देतो सांगून मोबाईल हातचलाखीने लांबवणे वा बळजबरी मोबाईल खेचून पळून जाण्याची आरोपींची कार्यपद्धती आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना ह्या आधी अटक केली होती. गुन्हा करण्यासाठी मेरठ व दिल्ली वरून आरोपी यायचे आणि शहरात लॉज मध्ये रहायचे. गुन्हे करून पार्ट गावी पळायचे अशी माहिती संजय हजारे यांनी दिली.