नारायण शेट्टी
शहापुरातील पंडितनाका येथे दहा-बारा वर्षापासून महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुकानातील सेल्समन दिनेश चौधरी (२८) हा दुकान बंद करून निघाला असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याच्या छातीत गोळी लागल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला. दरोडेखोर त्याच्याकडील बॅग खेचत होते.
एक महिला भाजी विक्रेती त्याच वेळी त्याच्या मदतीला धावली असता दरोडेखोरांनी त्या महिलेला सुद्धा धमकावले. त्या बॅगेत हिशोबाची नोंद असलेल्या डायरी व इतर काही कागदपत्रं असल्याचं सांगण्यात आले. जखमी अवस्थेतील दिनेशला शहापूरात प्राथमिक उपचार केल्यानंतर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे शहापूरात तीव्र प्रतिसाद उमटले.
संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ आपली दुकाने बंद ठेवून शहापूर पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढला. शहापूर तालुका ज्वेलर्स असोशियशनचे अध्यक्ष सुरेश शहा, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल व तालुक्यातील इतर व्यापारी संघटनेने या तातडीने तपास लावून हल्लेखोराव कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दिनेश चौधरी हा मूळचा राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील बाट गावातील रहिवासी असून सध्या तो शहापुरातील तावडेनगर येथे राहत होता. तो पाच वर्षांपासून महालक्ष्मी ज्वेलर्सकडे सेल्समन म्हणून काम करत होता. पंधरा दिवसांपूर्वी तो गावी गेला होता. त्याच लग्न जमलं होतं दिनेश हा पुढील महिन्यात विवाह बंधनात अडकणार होता. गावातून परत येताना त्याने कुटुंबासाठी नवीन कार खरेदी केली होती. त्याने आई, वडील कुटुंबीयांना सांगितलं की, पुढच्या वेळी मी येईन तेव्हा आपण एकत्र बाहेर जाऊ. त्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांसह पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी करून ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले. ३६ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही. व्यापारी आणि सराफ दुकानदार अद्यापही दहशतीच्या वातावरणात आहेत.