अंबरनाथ : अंबरनाथमधील नामांकित डॉक्टर हरीश लापसिया यांच्या घरावर काल रात्री ४ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. या दरोड्यात घरातील तब्बल १ कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटून नेले.
अंबरनाथच्या कानसई परिसरात डॉक्टर हरीश आणि उषा लापसिया यांचे उषा नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचाच वरच्या मजल्यावर डॉक्टर लापसिया यांचे घर आहे. काल रात्री ११.३० च्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोर या हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांनी तिथे असलेल्या नर्स आणि आया यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यांना पेशंटच्या खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावरील डॉक्टर लापसिया यांच्या घरात जाऊन थेट कपाटातील दागिने चोरायला सुरुवात केली. यावेळी डॉक्टर हरीश लापसिया हे त्यांच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होते, तर उषा लापसिया या त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यांना दरोडेखोरांची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी त्यांचे तोंड दाबत चाकूचा धाक दाखवला आणि कपाटातील डिजिटल तिजोरी काढून घेऊन गेले. या तिजोरीत तब्बल १ किलो सोने, हिऱ्यांचे दागिने असा १ कोटी रुपयांचा ऐवज होता.
दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून नेला आणि हॉस्पिटलच्या दाराला बाहेरून कडी लावली. यानंतर उषा लापसिया यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना याची माहिती देताच शेजारी मदतीला धावले आणि सर्वांची सुटका केली. या घटनेप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून या दरोड्याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
डॉक्टर उषा लापसिया यांच्यासोबत यापूर्वी जून महिन्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. तर त्यानंतर त्यांच्यासोबत ऑनलाईन फ्रॉडचाही प्रकार जून महिन्यातच घडला होता. यानंतर आता त्यांच्या घरी दरोडा पडल्याने एखाद्या माहितीतल्याच व्यक्तीचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरोडेखोरांनी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उषा या किती वाजता घरी जातात आणि त्यांचे पती हरीश हे घरी किती वाजता येतात याचा अंदाज घेऊन त्यानुसारच दरोड्याचा प्लॅन केला होता. रात्री अकराच्या सुमारास हा दरोडा घालण्यात आला.