आशिष गावंडे, अकाेला: सहकार नगरमधील उद्याेजकाकडे घरफाेडी करणारा आराेपी जिगर कमलाकर पिंपळे याला शुक्रवारी खदान पाेलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पाेलिस काेठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. १३ मे पर्यंत काेठडी मिळालेल्या आराेपीकडून पाेलिसांना काही महत्वाचे धागेदाेरे गवसतात का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व खदान पाेलिसांकडून समांतर तपास केला जात आहे.
गाेरक्षण मार्गावरील सहकार नगरस्थित उद्याेजक ब्रिजमाेहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरुन चाेरट्यांनी साेन्या चांदीच्या दागिने व काही राेख रकमेसह एकूण ४४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३ मे राेजी मध्यरात्री घडली हाेती. या प्रकरणी ४ मे राेजी खदान पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली हाेती. स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी ४८ तासांत छडा लावत अहमदनगर जिल्ह्यातून आराेपी जिगर कमलाकर पिंपळे (३७,रा.पाखाेरा,ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर) याला ६ मे राेजी अटक करुन खदान पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते. खदान पाेलिसांनी आराेपीला ७ मे राेजी न्यायालयात हजर केले असता, त्याला १० मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली हाेती. आज पुन्हा आराेपीला न्यायालयासमाेर हजर केले असता, १३ मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.