ढोकी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील जिल्हा बँकेची शाखा फोडून अज्ञाताने सुमारे १६ लाखांची रोकड लंपास केली. मागील काही दिवसांपासून ढोकीसह परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांतून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ढोकी येथे जिल्हा मध्यमवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शुक्रवारी सायंकाळी कार्यालय बंद करून कर्मचारी घरी गेले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता शाखा व्यवस्थापक बँकेत आले असता, चोरी झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांनी कार्यालयात जावून पाहणी केली असता, तिजोरी गॅस कटरच्या माध्यामातून तोडून आतील सुमारे १६ लाख १७ हजार ४९१ रूपये चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
बँकेत ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात आलेले नाहीत. तसेच सुरक्षा रक्षकही तैनात नाहीत. हीच संधी अज्ञातांनी बँकफोडी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर ढोकी ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, चोरट्यांचा माग गवसला नाही. मागील काही दिवसांपासून ढोकीसह परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे.