गंगाखेड (परभणी ) : परळी रोडवरील शिवाजीनगर तांडा शेत शिवारातील आखाड्यावर चार चोरट्यांनी दरोडा टाकुन तिघांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.२५ ) रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे.
गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासुन जवळच असलेल्या शिवाजीनगर तांडा शेत शिवारातील आखाड्यावर शेतमालक विश्वनाथ नामदेव निळे (६०) हे पत्नी राजुबाई (५५) व मुलगा संतोष (२३) यांच्यासोबत राहतात. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास विश्वनाथ यांना घराबाहेर काही तरी आवाज आले. यामुळे ते आखाड्याबाहेर आले. बाहेर येताच चड्डी व काळ्या लाल रंगाच्या बनियानवर असलेल्या चार चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या तोंडावर काठीने जोरदार प्रहार केला. काठीचा मार बसताच विश्वनाथ जोरात ओरडल्याने त्यांची पत्नी व मुलगा घराबाहेर आले. तेंव्हा चारही चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात राजुबाई यांच्या तोंडावर व संतोष याच्या डोक्यात आणि डाव्या हातावर काठीने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १४२०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत माहिती मिळताच मध्यरात्रीच्या सुमारास पो.नि. सोहन माछरे, सपोनि. राजेश राठोड, पोउपनि. भाऊसाहेब मगरे, रवि मुंडे आदींनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंत मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती मुंडे, परिचारिका संगिता लटपटे, राजेंद्र गायकवाड, सदाशिव लटपटे यांनी प्रथमोपचार केले. राजुबाई व संतोष यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वनाथ यांनी पहाटे पाच वाजता दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुध्द कलम ३९४ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी सुधाकर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सुचना दिल्या. याचा पुढील तपास सपोनि सुरेश थोरात, पोउपनि रवि मुंडे, पो.शि. गणेश वाघ, संदीप पांचाळ हे करत आहेत.