सफाळे - सफाळे परिसरात घरफोड्या करणाऱ्या मूळ गुजरात राज्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. सफाळे पश्चिमेला बस आगाराच्या बाजूला के.आर. आर्किटेक कार्यालय, मोबाईलची दुकाने, मंदिरातील दानपेटी अशा तीन ठिकाणी चोरी करीत अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे सामान लंपास केले होते. या संदर्भात सफाळे पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांत पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून विराथन बुद्रुक येथे राहणारे मात्र मूळ गुजरात राज्यातील नाजू सौशिंगभाई पलास (२२), अजय भलीयाभाई मावी (१९), किसन लखू परमार (१९) या तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.या आरोपींनी सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स.पो.नि. सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, हवालदार महेंद्र शर्मा, पो.ना. संदीप नांगरे,पो.कॉ. अमर गायकवाड, पो.कॉ. शिवपाल प्रधान यांनी केली आहे.
सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:46 AM