मुंबई :
इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक सुब्राज्योती भराळी याने बँकेत केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी त्याची ३० कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत शशीकुमार टी कंपनीचे ८७ लाख शेअर्स, काही भूखंड आणि रोख रकमेचा समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुब्राज्योतीने स्वतःच्या पदाचा गैरवापर करत बँकेचे फिल्ड ऑफिसर, वित्त पुरवठा अधिकाऱ्यांचे पगार, भत्ते यांच्यात भरमसाठ वाढ केली. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर संपूर्णपणे स्वतःच नियंत्रण ठेवले होते. पगार व भत्त्यापोटी पैसे या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ते रोखीने काढून अथवा त्या खात्यातून काही रक्कम स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावे वळवून त्याचा वैयक्तिक गोष्टींसाठी वापर करत असल्याचे ईडीच्या तपासात पुढे आले. ही रक्कम ९ कोटी ५१ लाख इतकी आहे. दरम्यान, याप्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. यानंतर हा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर २३ जून रोजी ईडीने सुब्राज्योती भराळी याला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
गैरव्यवहारांची जंत्री... सुब्राज्योतीने सुमारे ११ अपात्र कर्जदारांना वाहन कर्ज दिले तसेच त्यांच्या लहानमोठ्या मुदतठेवींवरदेखील ओव्हर ड्राफ्ट सुविधा देत त्याद्वारे सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये त्याने हडप केले. काही स्वयंसहायता गटांनाही कर्ज देत ते रोखीने काढून त्याचा वैयक्तिक वापर केला. बँकेत केलेल्या घोटाळ्यातील बहुतांश पैसा सुब्राज्योतीने शशीकुमार टी कंपनीमध्ये गुंतवत त्या कंपनीचे ८७ लाख शेअर्स खरेदी केले. या शेअर्ससह काही भूखंड आणि रोख अशी ३० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त.