नाशिक - इगतपुरी तालुक्यातील पाडळी येथून पिंपळगावला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या 72 वर्षीय वृद्धाला तपोभूमीत घेऊन जात रिक्षाचालकासह अन्य दोघांनी शिवीगाळ व मारहाण करून जबरी लूट केल्याची घटना घडली. वृध्दाच्या खिशातून मोबाइल, 5 हजार रुपयांची रोकड लुटून संशयितांनी पोबारा केला. तपोवनात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी तपोवन दर्शनासाठी येणाऱ्या भाविक पर्यटकांसाठी धोकेदायक ठरू लागल्याचे बोलले जात आहे. नेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. याबाबत पाडळी येथे राहणाऱ्या पांडू सखाराम घाटेसाव यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या रविवारी दुपारी चार वाजता घाटेसाव पाडळी येथून पिंपळगावला जाण्यासाठी वाहनाची वाट बघत असतांना एक रिक्षा आली क्रमांक (एम एच 15 5339) त्यातील रिक्षाचालकाने कुठे जायची याची विचारणा केली असता त्यावर वृद्धाने पिंपळगाव कडे जायचे आहे असे सांगितले तेव्हा रिक्षाचालकाने आम्ही तिकडे चाललो आहे असे सांगून त्यांना रिक्षात बसविले. इगतपुरी येथून रिक्षा नाशिकला आल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात रिक्षाचालकाने व रिक्षात बसलेल्या त्याच्या साथीदारांनी रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरायचा आहे, असे सांगून रिक्षा तपोवनमधील एका कच्च्या रस्त्यावर नेली. निर्जनस्थळाचा फायदा घेत संशयितांनी फिर्यादी पांडू सखाराम घाटेसाव (७२)यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल, आधार कार्ड तसेच पाच हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून घेत पोबारा केला. याबाबत अज्ञात लुटारू विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या तपोभूमीत एका वृद्धाची रिक्षाचालकांकडून लूट, वाढती गुन्हेगारी भाविक पर्यटकांसाठी ठरतेय घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 9:09 PM