लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : घरमालक घरात हजर असताना उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून आठ तोळ्यांचे दागिने चोरीला गेले होते. चोर घरातीलच असावा, असा संशय पोलिसांना होता; पण एलएलबी शिकणाऱ्या मुलाला हात लावता येत नव्हता. तेव्हा पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यातील संशयिताला त्याच्यासमोर पोलिसी खाक्या दाखविला. ते पाहून या मुलाला घाम फुटला अन् तो घडाघडा बोलू लागला. कोंढवा पोलिसांनी ४ लाख रुपयांचे ८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
उंड्री येथील एका व्यावसायिकाच्या पत्नीने ड्रॉव्हरमध्ये दागिने ठेवले होते. त्यानंतर त्या बाळंतपणासाठी माहेरी गेल्या. त्यांना मुलगा झाल्यानंतर ते सासरी पुन्हा आल्या. त्यानिमित्त घरात कार्यक्रम ठेवला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ड्रॉव्हरमध्ये पाहिले तर दागिने नव्हते.सहायक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व तपास पथकातील अंमलदारांना चोर घरातीलच असावा, असा संशय आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांकडे चौकशी केल्यावर घरातील एका मुलावर पोलिसांना संशय आला. परंतु, तो एलएलबीचे शिक्षण घेत असल्याचे त्याला नेहमीच्या पद्धतीने पोलिसी खाक्या दाखवणे शक्य नव्हते. त्यामुळे पाेलिसांनी मानसशास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला.
इतर गुन्ह्यातील संशयित आरोपीकडे या मुलाच्या समोर पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याला पोलिस खाक्या दाखविल्यावर या मुलाला आपल्यावरही हा प्रयोग होईल, असे वाटले आणि त्याला घाम फुटला. त्याने घडाघडा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याने चोरलेले दागिने जप्त केले. हा मुलगा एलएलबी शिकत असून, त्याला एक कोर्स करायचा होता. परंतु, फी भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. घरातील परिस्थितीही तशी नव्हती. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान त्याने हे दागिने लांबविले होते.
ही कामगिरी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, निरीक्षक संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.