मुंबई - प्रवासादरम्यान अनोळखी सहप्रवाश्याकडून बिस्कीट खाणं एका प्रवाश्याला महागात पडलं आहे. रोहित शर्मा नावाच्या प्रवाश्याने 13 ऑक्टोबर रोजी कुर्ला टर्मिनसवरून सुटणाऱ्या पवन एक्सप्रेसमधून प्रवास सुरु केला होता. त्यावेळी त्याच्या सीटच्या बाजूला तीन जण बसले होते. त्यांनी रोहितची चौकशी करत आपल्यासोबत चहा पिण्यास सांगितलं. चहा पिता पिता गप्पा मारत असताना त्या तिघांनी रोहितला बिस्कीटं दिली. गप्पांच्या ओघात रोहितने ती बिस्कीटं खाल्ली. बिस्कीटं खाल्ल्यानंतर त्याला गुंगी येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर अंदाजे दहा तासांनी रोहतला जाग आल्यानंतर त्याच्याकडील २५ हजार रुपये, कपड्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आलं.
रोहितने त्वरित रेल्वे पोलीस ठाणं गाठत या घटनेची तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी कुर्ला टर्मिनसवरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत राजेश पाल (वय 38), पपी भारतीया (वय 34) आणि राजकुमार केसरवानी (वय 36) या तिघांनाही अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांना गुंगीच्या गोळ्या मिसळलेला चहा, बिस्कीटं, कोल्डड्रिंक देऊन ते लुटमार करतात अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.