कळंब (यवतमाळ) : अडत व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर २१ लाख रुपयांनी लुटल्याची घटना सोमवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. कळंब-राळेगाव मार्गावर असलेल्या उमरी ते सावरगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. दोन दुचाकीवर आलेल्या आणि तोंडाला काळा कापड बांधून असलेल्या चौघांनी या व्यापाऱ्याला लुटले. रामदास वामन चौधरी (रा.दहेगाव, ता.कळंब) असे लुटल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. रामदास चौधरी व त्यांचे सहकारी दिवसभर व्यापार करून राळेगाव येथून दुचाकीने गावी दहेगाव येथे निघाले होते. गावजवळ आलेले असतानाच उमरी ते सावरगाव मार्गावर असलेल्या भुताच्या नाल्याजवळ त्यांना दोन दुचाकीवर असलेल्या चार जणांनी अडविले. त्यांनी चौधरी यांना चाकूचा धाक दाखविला. सोबत असलेली रक्कम हिसकावून घेत हे चौघे तेथून पसार झाले. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती गावातील सहकाऱ्यांना दिली.
व्यापारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लागलीच कळंब पोलीस ठाणे गाठले. झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती याठिकाणी त्यांनी नोंदविली. लुटारूंनी डोळ्यात तिखट टाकले, चाकूही टोचला, असा घटनाक्रम त्यांनी याठिकाणी सांगितला. हे लुटारू नेमके कुठले होते, व्यापारी मोठी रक्कम घेऊन निघाल्याची माहिती त्यांना कशी मिळाली आदी प्रश्नांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मात्र, आता या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. राळेगाव आणि कळंब परिसरातील अनेक व्यापारी आणि व्यावसायिक दैनंदिन व्यवहाराची रक्कम घेऊन गावाकडे जातात. साधारणत: रात्रीच्यावेळीच त्यांचा गावाचा प्रवास सुरू होतो. अडत व्यापाऱ्याला लुटल्याच्या घटनेने इतर व्यापाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रामदास चौधरी यांना लुटणाऱ्या लोकांचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे.