Rohit Pawar Reaction, ED Enquiry : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. बारामती ॲग्रोमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकारणाबाबत त्यांना ईडी चौकशीला मुंबई कार्यालयात बोलवण्यात आले आहे. ही कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. तसेच, रोहित पवार यांच्या चौकशी दरम्यान खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेही शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"मी सध्या एवढंच बोलेन की अधिकारी त्यांचे काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत माझ्याकडून जी जी माहिती मागितली आहे ती मी त्यांना दिली आहे. आज मला इथे चौकशीसाठी बोलावले आहे तर मी तिथे जाऊन त्यांना पुन्हा एकदा ती कागदपत्रे देईन. त्यांच्याशी चर्चा करेन. अधिकारी त्यांचे काम करत आहेत, पण यामागे विचार काय, शक्ती कोणती, याबाबत मी भाष्य करणार नाही. लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असे दिसले की मी काढलेली युवासंघर्ष यात्रा आणि सरकारविरोधात उठवलेला आवाज यामुळे ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. पण मी अजूनही हेच म्हणेन की अधिकारी त्यांचं काम करत आहेत," असे रोहित पवार चौकशीला जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार?
"आम्ही सर्व प्रकारची माहिती सीआयडी, इओडब्ल्यू, ईडीला दिली आहे. त्यांनी पुन्हा तीच माहिती मागवली आहे. त्यामुळे ती माहिती परत घेऊन मी ईडी कार्यालयात जाणार आहे. चौकशीदरम्यान काय होईल याची मानसिक तयारी करण्याची गरज नाही. त्यांच्या कार्यालयात त्यांच्याप्रमाणेच कारवाई होणार याची मला कल्पना आहे. चूक केली नसेल तर घाबरायचं कारण काय? त्यांनी मला नुसतंच बसवून ठेवलं तर मला मोकळा वेळ मिळेल आणि त्या वेळेत मी सरकार विरोधात कशापद्धतीने रणनिती आखायची याबाबत विचार करेन. आणि चौकशी संपल्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढण्यासाठी मी कायम तयार असेन," असे उत्तर त्यांनी दिले.
महायुतीमध्ये जाणार का?
"जनतेच्या प्रेरणेने चालणारा कार्यकर्ता हा कधीच पळून जात नाही. तो लढत असतो, संघर्ष करत असतो. मी देखील या लोकांच्याच विचाराने चालणारा माणूस आहे. मला जे विचारलं जाईल त्याला मी नक्कीच सहकार्य करेन. पण मी पळून जाणार नाही हे नक्की. जोवर मला यश मिळत नाही तोवर मी लढत राहिन," असे रोहित पवार म्हणाले.