मुंबई - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ई-चलानद्वारे जारी झालेला थकीत दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चालकांच्या घरी नोटीस बजावण्यास सुरवात केली होती. त्याअंतर्गत आता महिन्याभरात दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सुमारे पाच हजार चालकांकडून हा दंड वसूल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महिन्याभरापूर्वी १० हजाराहून अधिक रकमेचा दंड थकलेल्या चालाकांच्या घरी जाऊन वाहतुक पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरूवात केली होती. त्याअंतर्गत ९०१८ चालकांना नोटीस बजावण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात पोलिसांनी दीड कोटी रुपये जमा केले आहेत. अद्याप ४ हजाराहून अधिक चालकांनी ही रक्कम भरण्यासाठी काही कालावधी मागितला आहे. २० हजारांहून अधिक दंडाची रक्कम असलेल्या अनेक चालकांनी २ टर्ममध्ये पैसे भरण्याची परवानगी मागितली आहे. त्यांची पैसे भरण्याची तयारी असल्यामुळे त्याना तेवढी सवलत देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
२०१९ च्या फेब्रुवारी महिन्यापासून ई चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या हातातील पावती पुस्तक जाऊन हातामध्ये मशीन आल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील दंडात्मक कारवाईच्या संख्येतही वाढ झाली. परंतु दुसरीकडे दंडाची थकबाकी प्रचंड वाढू लागली. वाहनमालक दंड भरत नसल्यानं अनेक गाड्यांवरील थकीत दंडाची रक्कमही मोठी आहे. प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने विशेष मोहिम राबवली होती.