नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ने मोठी कारवाई केली आहे. घरामधून तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्क स्ट्रीट येथील एलियट रोडवर टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलियट रोडवरील पार्क स्ट्रीट परिसरातील एका घरावर एसटीएफने छापा टाकला. तेव्हा घरामध्ये पैशांनी भरलेली एक बॅग सापडली. या बॅगेमध्ये नोटांचे बंडल आढळून आले आहेत. रकमेसोबतच दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. जवळपास एक कोटी 62 लाखांची रोकड असल्याची माहिती मिळत आहे. मात्र घरातील सदस्यांना घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याबाबत विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत.
देशी बनावटीच्या आठ पिस्तुल सापडल्या
पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करत असून काही लोकांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे एसटीएफने आणखी एक छापा टाकला आहे. स्टरँड रोडवर हा छापा टाकला असून यामध्ये देशी बनावटीच्या आठ पिस्तुल सापडल्या आहेत. यावेळी घरात असणाऱ्या दोन हत्यार विक्रेत्यांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या दोघांनाही पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप
काही दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) हैदराबादमधील मल्काजगिरी परिसरात राहणाऱ्या एसीपीच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईत तब्बल 70 कोटींहून अधिक अवैध संपत्ती समोर आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नरसिम्हा रेड्डी असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. रेड्डी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला असता हा प्रकार समोर आला होता. नरसिम्हा रेड्डी यांच्या घराशिवाय एसीबीने त्याच्या नातेवाईकांच्या घरी देखील छापा टाकला. तपासात अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने जवळपास तब्बल 70 कोटींची संपत्ती जमवल्याचं समोर आलं. घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अनेक मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.