लातूर - शहरातील टिळक नगर भागातील एका कंत्राटदाराचे घर फोडून चोरट्यांनी तब्बल २५ लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ ते ३० डिसेंबरच्या रात्री घडली आहे़. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले, टिळक नगर येथील कंत्राटदार विवेक माधव रेड्डी हे कुटुंबासह २२ डिसेंबर रोजी पुणे येथे गेले होते. तेथून ते ३० डिसेंबरला फिरायला गेले होते. ३० डिसेंबर रोजी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भाडेकरुने फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती त्यांना दिली. तद्नंतर त्यांनी मित्राच्या मुलाला घरी पाठवून खात्री करून घेतली. चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील कुलूप तोडून जिन्याद्वारे घरात प्रवेश केला. घरातील चार बेडरुम, दोन्ही बैठका आॅफिस, देवघर, चेंजिंग रुम आदींचे कुलूप तोडून आतील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. बेडरुममध्ये टीव्हीच्या खाली ठेवण्यात आलेले रिव्हॉल्वर व गोळ्याही चोरट्यांनी पळविल्या. ३१ डिसेंबर रोजी विवेक रेड्डी हे घरी आले असता अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुसऱ्या चावीने घरातील मौल्यवान वस्तू, दागिने असे एकूण २५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज पळविल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती विवेक रेड्डी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी १३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख २ लाख ३५ हजार रुपये, ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे हिºयाचे दागिने, अमेरिकन डॉलर ८४ हजार रुपये, ४ लाख रुपये किंमतीचे रिव्हॉल्वर असा एकूण २५ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास एपीआय राहुल तरकसे करीत आहेत.
घराचे कुलूप तोडून केली धाडसी चोरी
रेड्डी कुटुंबीय हे सुट्टीनिमित्त फिरायला बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल ४६० ग्रॅम सोने, रोख २ लाख ३५ हजार, हिऱ्याचे दागिने, अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे चेक आदी मौल्यवान साहित्य लंपास केले. दरम्यान, विवेक रेड्डी हे सोमवारी लातुरात घरी आले असता त्यांनी सर्व पाहणी करून शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रार दिल्यावर पोलीस उपाधीक्षक सांगळे, पोलीस निरीक्षक लाकाळ यांनी पाहणी केली.