लातूर : शहरासह जिल्ह्यातील जवळपास दोन हजार नागरिकांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून तब्बल दहा कोटीना गंडा घालणाऱ्या कंपनीचा चेअरमन नंदलाल केशरसिंग ठाकूर (५५ रा. गाेरेगाव, मुंबई) याच्यासह मुलाच्या बॅक खात्यातील रक्कम वेगवेगळ्या मार्गाने वळती करण्यात आलेली ३ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. त्याचबराेबर लातुरातील मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाइ लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चालकाने लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास दाेन हजार नागरिकांना रक्कम गुंतविल्यास निर्धारित वेळेत दामदुप्पट दिली जाणार आहे. शिवाय, आराेग्याच्या सवलती देण्यात येतील, माेफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी बतावणी करुन जवळपास १० काेटी रुपयांना फसविल्याप्रकरणी २०१८ मध्ये शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, याप्रकरणी काही संचालकांना अटक करण्यात आली. मात्र, प्रमुख आराेपी असलेला कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर हा फरार हाेता. त्यांच्याविराेधात लूकऑऊट नाेटीस जारी करण्यात आली हाेती. मुंबई येथील विमानतळावरुन त्याला अटक करुन लातुरात आणण्यात आले. लातूर न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
सध्या ताे लातूर येथील शिवाजीनगर ठाण्याच्या काेठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेअरमन नंदलाल ठाकूर आणि त्याच्या मुलाने विविध बॅक खात्यातील आणि वेगवेगळ्या खात्यावर वळविलेली ३ काेटी ५ लाखांची रक्कम गाेठविण्याची कारवाई केली आहे. फिनाॅमिनल कंपनीचा चेअरमन याने न विकलेल्या आणि घेवून न गेलेल्या मालमत्तांचा शाेध घेतला जात आहे. त्याचबराेबर नंदलाल ठाकूर आणि मुलगा सितारा ठाकूर यांच्या वेगवेगळ्या खात्यातील रक्कम गाेठविण्याबाबतचे कायदेशीर प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. आता या कंपनीच्या मालमत्तावरही टाच आणण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक बालाजी माेहिते यांनी सांगितले.
फरार संचालकांच्या मागावर पाेलीस...फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चेअरमनसह इतर २२ संचालकांविराेधात लातुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यातील फरार असलेल्या संचालकांच्या मागावर पाेलीस आहेत. एका-एका माशाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कंपनीच्या चेअरमनच्या मुसक्या मुंबई येथील विमानतळावरुन आवळल्या आहेत. यामध्ये बहुतांश संचालक म्हणून नंदलाल ठाकूर यांच्या जवळच्याच नातेवाईकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये समाेर आले आहे. या संचालकमंडळाने संगणमत करुन विविध आमिष दाखवत गुंतवणूकदारांना फसविल्याचे पुढे आले आहे.