मुंबई : केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) विभागाच्या दक्षिण विभागाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) तयार करणाऱ्या व्यावसायिकाला शनिवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने, सात कोटींची बनावट आयटीसी तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीजीएसटीच्या दक्षिण विभागाने सोने-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी असलेले मेसर्स ऋषभ बुलियनच्या भागीदाराला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता ७.११ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटची (आयटीसी) फसवणूक आणि वापर करत असल्याचे समोर येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सीजीएसटी कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान दोन बनावट कंपन्याही समोर आल्या. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.