मध्य प्रदेश आरटीओ माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्माकडे ७.९८ कोटी रुपयांची मालमत्ता सापडली आहे, ज्यात २.८७ कोटी रुपये रोख आणि २३४ किलो चांदीचा समावेश आहे. छापा टाकल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी ही माहिती दिली.
लोकायुक्तांच्या विशेष पोलीस आस्थापनेने (एसपीई) १८ आणि १९ डिसेंबर रोजी राजधानी भोपाळमधील त्याचं निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतल्यानंतर सौरभ शर्माची मालमत्ता जप्त केली आहे.
लोकायुक्त पोलीस महासंचालक जयदीप प्रसाद यांनी सांगितलं की, सौरभ शर्माचे वडील आरके शर्मा हे सरकारी डॉक्टर होते आणि २०१५ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर, सौरभची २०१५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर राज्य परिवहन विभागात कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली.
अधिकाऱ्याने सांगितलं की, माजी कॉन्स्टेबलने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर त्याची आई, पत्नी, मेहुणा आणि जवळचे सहकारी चेतन सिंग गौर आणि शरद जैस्वाल यांच्या नावाने शाळा आणि हॉटेल्स बांधून आणखी मोठी मालमत्ता मिळवण्यासाठी केला आहे.
अरेरा कॉलनीतील ई-७ सेक्टरमधील त्याच्या निवासस्थानी छापा टाकला असता, १.१५ कोटी रुपयांची रोकड (परकीय चलनासह), ५० लाख रुपयांचे दागिने आणि २.२१ कोटी रुपयांची वाहनं आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
प्रसाद म्हणाले की, त्याच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर १.७२ कोटी रुपये रोख, २.१० कोटी रुपयांची २३४ किलो चांदी आणि ३ कोटी रुपयांची इतर मालमत्ताही सापडली. लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, संबंधित जागेवर टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत ७.९८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सापडली आहे.
सौरभ शर्मा, त्यांची पत्नी, आई आणि सहकारी गौर आणि जयस्वाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. गौर याच्याकडून आयकर विभागाने रोख रक्कम आणि सोनंही जप्त केलं आहे.
जयदीप प्रसाद म्हणाले की, झडतीदरम्यान सापडलेले बँक अकाऊंट आणि जमिनीची कागदपत्रं तपासली जात आहेत. १९ डिसेंबर रोजी एका वेगळ्या कारवाईत, आयकर विभागाने भोपाळच्या बाहेरील गौरच्या कारमधून १० कोटी रुपये रोख आणि ५० किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं होतं.