डोंबिवली : अनधिकृत इमारतींचे बांधकाम पाडण्याची धमकी देत आठ कोटींची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली एकाच कुटुंबातील चौघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विद्या विश्वनाथ म्हात्रे, त्यांचे पती विश्वनाथ म्हात्रे, दीर सुनील एकनाथ म्हात्रे व सासरे एकनाथ म्हात्रे अशी चौघांची नावे आहेत. हा गुन्हा विष्णूनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधितांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.नांदिवली येथे बांधलेल्या इमारती अनधिकृत असून त्या पाडण्याची धमकी देत विद्या म्हात्रे यांनी सात कोटींची मागणी केली. जमीन मालक इंदिरा म्हात्रे आणि विकासक खेमजी चौधरी यांच्याकडून एक कोटी रोख, पाच कोटी रुपये धनादेशाद्वारा, असे सहा कोटी तसेच एक कोटी २४ लाख रुपये किमतीच्या चार सदनिका, असे एकूण तब्बल सात कोटी २४ लाख ९४ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. दशरथ म्हात्रे यांचे विकासक आर्याविक्रम सिंग यांनाही इमारत पाडण्याची धमकी देत त्यांच्याकडून २८ लाख ७१ हजार रुपये किमतीचे दोन गाळे व २३ लाख ७२ हजार रुपये किमतीची एक सदनिका अशी एकूण ५२ लाखांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप चौघांवर आहे.
आठ कोटींच्या खंडणीत चाैघांवर गुन्हे दाखल, अटकपूर्व जामिनासाठी धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 1:42 AM