चित्तोडगड : राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संयोजकाच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण पसरले आहे. रत्न सोनी असे या संयोजकाचे नाव असून एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना आपसी वादातून झालेल्या भांडणात दुसऱ्या समाजातील तीन-चार तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात रत्न सोनी यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदू संघटनेच्या काही लोकांनी रात्रभर शहरातील प्रमुख चौकात निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.
ही घटना कच्छी बस्ती भागात घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे काही तरुणांनी रत्न सोनी यांच्यावर आपसी वादातून झालेल्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. यामध्ये रत्न सोनी जखमी झाले. यानंतर त्यांना उदयपूर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रत्न सोनी यांच्या मृत्यूची बातमी समजताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली. यानंतर शहरातील सुभाष चौकात हजारो लोकांनी रात्रभर निदर्शने करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, हिंदू संघटनांचा विरोध पाहता पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले. यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत गोंधळ घातला आणि जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते कोतवाली पोलिस ठाण्यापर्यंत रस्ता अडवून निदर्शने केली. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण शांत झाले.
सध्या शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याशिवाय, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. डोक्याला मार लागल्याने रत्न सोनी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.