नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत मोठ्या अधिकाऱ्यांपासून तर थेट परिवहन मंत्र्यांपर्यंत करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या प्रकरणात राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांचा जबाब शहर गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आला असून त्यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सात शासकीय अधिकारी, एक अशासकीय अशा नऊ व्यक्तींचा जबाब पोलिसांकडून घेण्यात आला आहे.राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह आरटीओंच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांवर पदोन्नतीच्या बदल्यांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सुमारे १४ पानी तक्रार याच खात्यातील वाहन निरिक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीमध्ये करण्यात आलेले आरोप आणि ज्या व्यक्तींचा भ्रष्टचाराच्या प्रकरणांमध्ये नामोल्लेख केला गेला आहे, त्या व्यक्तींचे पदे लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित सात अधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ढाकणे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. शनिवारी सकाळी शहरातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात ढाकणे हजर झाले. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची याप्रकरणात चौकशी करत जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहार व आदेशांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचेही आदेश दिले आहेत. सोमवारपर्यंत या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गुन्हे शाखेकडे जमा केले जाणार आहेत.गजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होऊन आपला जबाब लेखी स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावरसुध्दा करण्यात आला आहे. पाटील यांनी या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत ईडी, सीबीआयसारख्या त्रयस्थ संस्थांमार्फत चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत केली आहे.
आरटीओ भ्रष्टाचार प्रकरण : राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:26 PM
गजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होऊन आपला जबाब लेखी स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावरसुध्दा करण्यात आला आहे.
ठळक मुद्देईडी, सीबीआयसारख्या त्रयस्थ संस्थांमार्फत चौकशीची मागणीगजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होण्याची शक्यता