मडगाव - पोळे चेक नाक्यावर येणा:या ट्रक चालकांकडून हप्ते वसुल करण्याच्या आरोपाखाली अटक केलेले आरटीओ निरीक्षक वामन प्रभू व अन्य दोघांच्या अधिक चौकशीसाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक दावे हाताळणारे खास न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला.
दरम्यान, प्रभू याने जामीनासाठी केलेल्या अर्जावर न्या. देशपांडे यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. या अर्जावरील निकाल आज शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. संशयिताच्यावतीने अॅड. पराग राव व अॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात आपल्या अशिलाचा कुठलाही हात नसल्याचा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे पोळे चेक नाक्यावर छापा टाकून प्रभू याच्यासह बसवराज गुरजनवार व जितेंद्र वेळीप याना अटक केली होती. त्यांच्याकडून 16,500 रुपयांची रोख जप्त केली होती. प्रभू याच्या सांगण्यावरुन इतर दोन एजंट ट्रकवाल्यांकडून पैसे घेत होते असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, संशयिताच्यावतीने जामीनासाठी अर्ज करताना या छापा टाकला गेला. तेव्हा निरीक्षक प्रभू आपल्या कार्यालयात झोपला होता. झोपलेल्या अवस्थेत असताना त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे कुठलीही रक्कम सापडली नाही. या कथित भ्रष्टाचारात त्याचा हात असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांकडे नसल्याने त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली.
सरकारी वकील लादिस्लाव फर्नाडिस यांनी या जामिनाला विरोध करताना ज्यावेळी हा छापा मारला गेला त्यावेळी जितेंद्र वेळीप व बसवराज गुरजनवार या दोन आरटीओशी संबंध नसलेल्या दोन व्यक्ती त्या कार्यालयात उपस्थित होत्या. तेच ड्रायव्हरकडून पैसे घेत होते. त्यावेळी प्रभू दुसऱ्या खोलीत झोपलेला होता. जर आरटीओ अधिकाऱ्याचा या भ्रष्टाचाराशी संबंध नव्हता तर या दोन अनधिकृत व्यक्ती त्यावेळी चेक नाक्यावर काय करत होत्या असा सवाल करुन हा सर्व प्रकार आरटीओ अधिकाऱ्याच्या संगनमताने होत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संशयितांना पोलीस कोठडीत ठेवून अधिक चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.