लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. आवश्यकता असल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असे ईडी सूत्रांकडून सांगण्यात आले.
ईडीने गेल्या आठवड्यात मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने ३० ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर, सांगलीसह तीन ठिकाणच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने ईडीने खरमाटे यांना समन्स बजावत सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खरमाटे वकिलासह ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह पत्नी आणि नातेवाईकांचे ४ मोबाईल तपासण्यात आले दरम्यान, यापूर्वी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत खरमाटेसह परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे.