मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीपैकी एक आणि मास्टरमाईंड टायगर मेमनची वहिनी रुबीना सुलेमान मेमनला मुंबईउच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आपल्या मुलीच्या निकाहला हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये रुबीनाला पोलीस बंदोबस्तात ६ दिवसांचा पॅरोल मंजूर केला. न्यायमूर्ति एसएस शिंदे आणि न्यायमूर्ति अभय आहूजा यांच्या खंडपीठासमोर ३१ डिसेंबर रोजी ही सुनावणी पार पडली.
२००६ साली विशेष टाडा न्यायालयाने रुबीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आऱोपी टायगर मेमनसोबत कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून टाडा न्यायालयाने रुबीनाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून रुबीना येरवडा मध्यवर्ती कारागृहात (महिला कक्षात) शिक्षा भोगत आहे. ८ जानेवारी रोजी आलिया या आपल्या मुलीच्या निकाहसाठी पॅरोल देण्यात यावा म्हणून रुबीनाने वकील फरहाना शहामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुट्टीकालीन न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांना आपल्या मुलीच्या लग्नासंबंधित विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किमान ७ दिवसांची रजा मंजूर करण्यात यावी अशी विनंती खंडपीठासमोर करण्यात आली. तसेच रुबिना १३ वर्षांहून अधिक काळ येरवडा कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
यापूर्वी त्यांना कधीच पॅरोलवर सोडण्यात आले नसल्याचेही वकील शहा यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले. तेव्हा, याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल मध्यवर्ती कारागृहातील राज्य सरकारी वकिलांकडे खंडपीठाने विचारणा केली होती. याचिकाकर्त्याच्या वर्तनाबद्दल पोलिसांचा खंडपीठाकडे अहवाल सादर करण्यात आला. त्याची दखल घेत मुलीच्या लग्नासाठी मानवतेच्या दृष्टीने याचिकाकर्त्यांची याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आणि पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अधिक्षकांना रुबीना यांना ६ जानेवारी ते ११ जानेवारी या सहा दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्यांना ५ जानेवारीपर्यंत १ लाख रूपये अनामत रक्कम जमा करण्याचे सांगत १२ जानेवारी रोजी पुन्हा येरवडा पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी १९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.
१२ मार्च 1993 रोजी मुंबईतील १३ विविध परिसरात बॉम्बस्फोट करण्यात आले होते. त्यात २५७ लोकांचा मृत्यू आणि सुमारे १४०० लोक जखमी झाले होते. या स्फोटांचे मुख्य सूत्रधारांमध्ये याकुब मेमन आणि टायगर मेमन यांचा समावेश होता. २०१५ मध्ये याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. तर दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहीम यांसह एकूण २७ आरोपी अजूनही फरार आहेत.