वसई - धुम्रपान करण्यासाठी वापरले जाणारे लायटर हे विविध आकारातले असतात. धुमप्रानाचे शौकीन वेगवेगळ्या आकारातले लायटर आवड, छंद म्हणून वापरत असतात. परंतु अशाच एका लायटरने सोमवारी संध्याकाळी ४.०३ वाजताच्या सुमारास विरार स्थानकात खळबळ उडवून दिली. कारण हे लायटर चक्क एका बंदुकीच्या काडतुसाच्या आकाराचे होते. ते लोकल ट्रेनच्या डब्यात आढळल्याने प्रवाश्यांमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यावर ते काडतूस नसून लायटर असल्याचे आरपीएफच्या जवानांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ३ मिनिटांनी विरारहून चर्चगेटला जाणारी डहाणू लोकल उभी होती. एका प्रवाशाला ट्रेनच्या बाकावर एक 'काडतुस' आढळले. त्याने रेल्वे सुरक्षा बलाला या प्रकऱणाची माहिती दिली. बघता बघता ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि बॉम्ब असल्याची अफवा पसरली. ९ एमएमचे जिवंत काडतुस रेल्वे लोकलमध्ये सापडल्याची ब्रेकींग वृत्तवाहिन्यांनी दिली. कुणी बॉम्बची अफवा असल्याचे म्हटले तर कुणी घातपातासाठी शस्त्रसाठा आणला गेल्याची अफवा रंगवली गेली. या घटनेचे गांभिर्य पाहून रेल्वे पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक (बीडीडीएस) पथकाला बोलावले. संपूर्ण डबा रिकामा करून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ते काडतूस नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ते काडतूस नसून काडतुसासारखे दिसणारे लायटर होते. प्लास्टिकमध्ये ते ठेवलेले होते. कुठला तरी प्रवासी तो विसरून गेला होता. त्या लायटरचा आकार काडतूसासारखा असल्याने गोंधळ उडाला असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले सांगितले.