मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी निवडणूक पथकाने काही भाजपा उमेदवाराचे बॉक्स पकडले. यावेळी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी बॉक्सची तपासणी सुरू असताना सोन्याची बिस्किटे आहेत तपासा असे सांगण्यात आले आणि घाटकोपर मध्ये सोन्याची बिस्किटे पकडल्याची चर्चा सुरू झाली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. मात्र, तपासणीत ते प्रचाराचे साहित्य असल्याचे समोर आले आणि चौकशीला ब्रेक लागला.
दुसरीकडे रात्रीच्या वेळी विनाकारण मुलीला ताटकळत ठेवल्याचा आरोप करत तृप्ती बडगुजर यांनी नाराजी वर्तवली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वीस लाखांहून अधिक जणांनी पहिला. ५० हजारांहून अधिक जणांनी प्रतिसाद दिला. बडगुजर यांच्या आरोपानुसार, रात्री एकच्या सुमारास निवडणूक कर्मचाऱ्यांनी कार थांबवून तपासणी सुरू केली. एक वाजता मुलींना घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले. तपासणीत त्यात प्रचाराचे साहित्य होते. त्याचे बिल मागण्यात आल्याचे म्हटले. या व्हिडिओ मध्ये तपासणी दरम्यान काही कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांना देण्यासाठीचे ते किट होते. सोन्याची बिस्किटे आहे तपासा असे म्हटल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त शेअर झाला.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असताना एसएसटी पथकाने एक कार अडवली. तपासणीदरम्यान मुली असल्याने त्यांनी रात्री उशिराने तपासणी करू शकत नाही म्हणताच महिला पोलिसांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात साहित्याची तपासणी केली. त्यात प्रचाराचे साहित्य मिळून आले. याबाबतची नोंद करण्यात आली असल्याचे सांगितले.
सोने नाहीच!
तपासणीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी तपासणी दरम्यान सोन्याची बिस्किटे आहेत तपासा असे म्हंटल्यामुळे सोन्याच्या बिस्किटांची चर्चा झाली. मात्र तपासणीत फक्त प्रचाराचे साहित्य होते. तसे काहीही आढळून आले नाही असे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.
वर्षा गायकवाड यांनीही केले ट्विट अन् राजकारण तापले!
सोशल मीडियावर सोन्याची बिस्किटे वाटल्याचे एवढे व्हायरल झाले की, वर्षा गायकवाड यांनीही घाटकोपरमध्ये सोन्याची बिस्कीट वाटत असल्याचे एक्सवर म्हणत व्हिडिओ शेअर केला. यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर हे अफवा असल्याचे समजताच त्यांनी ट्विट डिलीट केले. त्यानंतर, भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल अकाऊंटवर वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करत, पळकुटी काँग्रेस म्हणत पोस्ट डिलीट करून आता पळवाटा शोधण्यात अर्थ नाही. मतदारांची दिशाभूल करून मत मिळविण्याचा तुमच कारस्थान उघड झालं आहे. आता तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावेच लागेल असे म्हटले आहे.