कुरखेडा (गडचिरोली) : देसाईगंज ते कुरखेडा मार्गावरील गुरनोली फाट्यानजीक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने व्हॅनने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहाणी टळली. मात्र यात सदर वाहनासह त्यातील ६३ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. देसाईगंज येथील व्यावसायिक कैलाश आडकिने, विशाल आडकिने, मकसूद याकूब दलाल व शंकरपूर येथील हंसराज जगने यांच्यासह चालक प्रकाश बोरकर हे सर्व आज सकाळी व्हॅन क्रमांक एमएच २०, यु १४९५ या वाहनाने दुकानाचे साहित्य घेऊन छत्तीसगड राज्यातील कुंभकोट येथील मंडईत दुकान थाटण्यासाठी जात होते. मात्र रस्त्यात गुरनोली फाट्यानजीक त्यांच्या वाहनाने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली आणि सर्वजण पटकन वाहनातून बाहेर आले. आग विझविण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे ते वाहन काही वेळातच पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात वाहनातील दुकानचे ६३ हजारांचे साहित्यही जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.
धावत्या व्हॅनने घेतला पेट; पाच जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 9:12 PM