कल्याण- दिवाळीच्या मुहूर्तावर जीमचे उद्घाटन करण्याची जीम मालकाला घाई होती. जीम मालकाने तीन मजूरांना 24 तास कोंडून ठेवले. एवढेच नाही, तर काम झाले नाही, तर तुझी किडणी विकून पैसे वसूल करीन, अशी धमकीही त्याने फर्निचर काम घेणाऱ्या कंत्राटदाराला दिली होती. यामुळे भयभीत झालेल्या कंत्राटदाराने जीममध्येच कामाच्या ठिकाणी गळफास घेतला. अखेर कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी जीम मालक वैभव परबला अटक केली आहे.
कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात फिटनेस एम्पायर या जीमचे काम सुरू आहे. जीमचे मालक वैभव परब आणि त्यांच्या पार्टनरची इच्छा होती की, हा जीम दिवाळीच्या शुभमूहुर्तावर सुरु व्हावा. यासाठी सर्व प्रकारची तयारी सुरु केली होती. जीम मालक परब यानी फर्निचर तयार करण्याचे काम पुनमा राम चौधरी या कंत्राटदाराला दिले होते. पुनमा चौधरी यांनी कामासाठी काही मंजूर त्याठीकाणी लावले होते. 18 ऑक्टोबर रोजी जेव्हा मजूर राकेश कुमार, गोगा राम आणि सोलाराम हे जीममध्ये काम करण्यास गेले तेव्हा परब याने या तिघा मजूराना जीममध्येच कोंडून ठेवले. हे तिघेही 24 तास जीममध्ये उपाशीपोटी बंद होते.
दुसऱ्या दिवशी त्यांचा कंत्राटदार पुनमा राम चौधरी त्याठीकाणी आला. थोड्याच वेळात जीम मालक वैभव परबही तेथे पोहचला. वैभव परब याने पुनमा राम चौधरी याला मारहाण केली. तुला जे आगाऊ पैसे दिले आहेत. काम झाले नाही, तर तुझी किडणी विकून तुझ्याकडून पैसे वसूल करणार. तिघे मजूर दुसऱ्या कामासाठी दुसरीकडे निघून गेले. कंत्राटदार पुनमा राम चौधरी हा जीममध्ये एकटाच कामाला लागला. 19 तारखेला त्याचा मृतदेह जीममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. आज त्याचे कुटुंबीय कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी मागणी केली की, या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हरीदास बोचरे पाटील यांनी तपास सुरु केला. अखेर आत्मह्त्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वैभव परबच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे. वैभव याच्यामुळे पुनमाराम चौधरी याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेख यांनी सांगितले आहे.