युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. रशियन सैन्याने क्रूरतेचा कळस गाठला आहे. अंगावर काटा आणणाऱ्य़ा अनेक घटना आणि थरकाप उडवणारे अनेक फोटो हे सातत्याने समोर येत आहेत. युक्रेन आणि रशियामधील वाद आता आणखी चिघळला असून युद्ध पेटलं आहे. बूचा शहरात रस्त्यावर मृतदेह पडले आहेत. यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्तांनी मोठा दावा केला आहे. युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी "रशियन सैनिकांनी बुचामध्ये महिला आणि तरुणींवर बलात्कार केला. बेसमेंटमध्ये जवळपास 25 मुलींना ओलीस ठेवण्यात आलं होतं. रोज त्यांच्यावर बलात्कार होत होते. यातील बहुतांश मुली 14 ते 24 वयोगटातील आहेत. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरीक अत्याचार केले जातात. ओलीस ठेवलेल्या मुलींमधील अनेक मुली आता गरोदर आहेत" असं म्हटलं आहे.
रशियन सैनिक महिला आणि मुलींवर अत्याचार करत आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला असून तिला लोखंडी सळीने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच महिलांच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली जात आहे. युक्रेनच्या खासदाराने गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले. महिलांच्या शरीरावर डाग केले असा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी ट्विटरवरून केला आहे. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून डाग देण्यात आले आहेत.
हे डाग स्वस्तिकसारखे दिसत असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर करत "रशियन सैन्य युक्रेनमध्ये लोकांची लूट, बलात्कार आणि हत्या करत होते आणि रशियाला अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र म्हणून संबोधले" असं म्हटलं आहे. मारियूपोल, खारकीव्हनंतर आता बूचा शहर उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेनमधील लोकांना त्रास देण्यासाठी बूचाच्या चिल्ड्रन हेल्थ रिसॉर्टच्या बेसमेंटमध्ये टॉर्चर चेंबर बनवलं आहे. या बेसमेंटमध्ये पाच लोकांचे मृतदेह आढळून आले असून मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेहांचे काही भयंकर फोटो आता समोर येत आहेत. युक्रेनने दावा केला आहे की रशिया बूचा शहरात नरसंहार करत आहे. आतापर्यंत 300 हून अधिक सामान्य नागरिकांना मारलं आहे. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेनमधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.