मुंबई - व्हिसाची मुदत संपल्याने अडचणीत असलेल्या एका रशियन तरुणीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत पोलीस अधिकाऱ्यानेच १२ वर्षे बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भानुदास उर्फ अनिल जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव असून ३८ वर्षीय पीडित रशियन तरुणीने पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (प्रवक्ते) यांनी सांगितले.
पीडित तरूणी डिसेंबर २००३ मध्ये सहा महिन्यांच्या व्हिसावर भारतात आली होती. तिला फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये करीयर करायचे होते. सहा महिन्यांची व्हिसाची मुदत संपल्यावर भानुदास जाधव या अधिकाऱ्याने व्हिसा वाढवून देण्यात मदत करण्याच्या बहाण्याने तरूणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. याच कामाचे निमित्त सांगत तिचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतला. बड्या चित्रपट निर्मात्यांशी ओळख असल्याचे भासवतानाच व्हिसा संपला तरी दंड भरुन भारतात राहता येते, अशी बतावणी त्याने केली. मात्र ही रशियन तरूणी भुलथापांना बळी पडत नसल्याचे पाहून तरूणीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पुढे नोव्हेंबर २००६ साली हा अधिकारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षात कार्यरत असताना त्याने खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे या तरुणीला काश्मिरी ओळख मिळवून देण्यासाठी फिरोजा खान या नावाने खोटे पुरावे तयार करुन दिले. या नावाच्या आधारेच वर्सोवा परिसरात पेईंग गेस्ट म्हणून तिची राहाण्याची सोयसुद्धा केली. त्यानंतर या तरुणीला चेंबूरमधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावू नशेची गोळी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे अत्याचार सुरुच होते. दरम्यानच्या काळात त्याने तरुणीला आणखी काही बनावट दस्तऐवज बनवून दिले. या काळात तरुणी गर्भवती राहिल्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
पुढे ही तरुणी पुण्याला स्थायिक झाल्यावर तिथेही माग काढात पुन्हा शारिरीक संबंध बनविले. यातून ती पुन्हा गर्भवती राहीली. यावेळी लग्नानंतर मुलबाळ होऊ देऊ नको, असे सांगत गर्भपात करायला लावले. पुढे अली हे नाव घेऊन धर्म बदलत त्याने तिच्यासोबत लग्नसुद्धा केले. विवाहानंतर एप्रिल २०१४ मध्ये तरुणीने एका मुलाला जन्म दिला. मात्र मुलाला एका नातेवाईकाकडे ठेवत या अधिकाऱ्याने गेल्याच वर्षी तरुणीची रशियाला पाठवणी केली. ती पुन्हा भारतात येणार नाही अशी तजवीजही केली. मात्र जून २०१९ मध्ये ही तरुणी भारतात आली. पुण्यातील घर गाठले असता हा अधिकारी अन्य एका तरुणीसोबत असल्याचे तिने पाहिले. त्यानंतर घडलेला प्रकार अधिकाऱ्याच्या मित्राच्या पत्नीला सांगून आपल्या मुलाला परत मिळवत पोलिसांत धाव घेतली. दरम्यानच्या काळात या अधिकाऱ्याने आपल्याला आणि आपल्या मुलाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणीला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत त्याने तरुणीच्या भावालाही ठार केले. याचे आपण प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असल्याचाही आरोप या रशीयन तरुणीने केला आहे.एसीबीच्या जाळ्यात
२८ सेप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जाधवला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणी अटक केली. या प्रकरणात जाधव यांना निलंबीत केले होते.